Tuesday 21 October 2014

1. "सुख" म्हणजे नक्की काय असतं?

     मे-जून चा साधारण अप्रेजल चा काळ. आज फायनल लेटर मिळणार होतं. सकाळपासून डोक्यात विचारांचा भुंगा कीणकीणत होता. वर्षभर जरा चांगलं काम झालं होतं. चक्क टिम लीड कडून आणि म्यानेजर कडून फारच चांगले रेटिंग मिळाले होतेजे घडत नाही ते याची देही याची डोळा पहिल्या मुळे डोळे फाटायची वेळ आली होती! तर आज काय होईल याचाच भुंगा डोक्यात रुंजी घालत होता.

     संध्याकाळी जेव्हा टीम लीड ने लेटर मोठा तामझाम करत माझ्या हातात दिलं. वर अगदी अभिनंदन करून "सप्रेतुमच्या कडून या पेक्षा अधिक चांगल्या कामाची आम्ही अपेक्षा करतो" वगैरे इंग्लिश मध्ये मोठी वाक्य माझ्या वर उधळली (अर्थात फेकलीच. कारण टीम लीड आणि म्यानेजर या पेक्षा वेगळं काही करत नाहीत यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसेलच) तेव्हा छाती फुलून आली. जागेवर येउन मोठ्या खुशीत लेटर बघितलं. आणि …(सिंघम माझ्या समोर येउन चक्कं नाचला आईच्या गावात आणि बाराच्या भवत. आता माझी खरंच सटकली)…च्याइला अरे फक्त २.५% इन्क्रिमेंट? अरे महिन्याला ८००/- फक्त? मनात आलं, "टिम लीड, या लेटर ची सुरळी करून देतो तुला…….XXXX). अथक विचार केला मनात कि नक्की मी या वाढीव ८००/- चा खात्रीलायक विनियोग कसा करू शकेन बरं? सगळे पर्याय नकारार्थीच आले. २-३ तास कामंच केलं नाही शिफ्ट संपे पर्यंत. ४-५ चहा पिऊन झाले तरी डोकं काही शांत होईना. परत आलो तर टीम लीड (नेहमी प्रमाणे) निर्लज्ज पणे' "अवध्या, आजचा इशू तू हैंडल कर. शिफ्ट एक्स्टेंड कर १ तास आणि मिटिंग अटेंड कर. मला जरा बायकोला डिनरला न्यायचंय!". मनात (XXXX आणि बाराखडी). तिरमिरीत मिटिंग कशी तरी आटोपली. आणि लेट कॅब पकडायला खाली आलो.

     पाहतो तर आज ड्रायवर दादा होते अण्णा (भालचंद्र विनोदे). भालचंद्र (अण्णा) विनोदे - वय जवळपास ५५ च्या पुढे. उभट चेहरा. अस्सल मराठी मावळे शोभावेत असे जाड कल्ले आणि जबरदस्त छपरी मिश्या पार गालांपर्यंत. पाठीत थोडसं वयोमाना नुसार पोक आलेलं. पण त्यामुळे असं वाटावं कि अण्णा स्टीअरिंग वर आडवे होऊनच गाडी चालवतायत! गाडी कधी हि ६० ची सीमा ओलांडत नाही (अपवाद हायवे - इथं जेमतेम ७०). बोलताना कधीही खोचक बोलत नाहीत. इतकं छान मधाळ बोलतात कि जे बोलतात त्याला उत्तर देताना आपल्या तोंडून कधी "नाही" येतच नाही. समोरच्याच्या वयाच्या सीमा हा माणूस कधी न गाठता, मुलगा असेल तर "राव" आणि मुलगी असेल तर "माउली" या उपाधीनच हाक मारायचा. मला मात्र अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त "राव" एवढी लांब लचक उपाधी असायची. रांगडं प्रेम होतं बोलण्यात. दर वाकयामागे "काय?" असा कायम सवाल असायचा "आज अमुक ठिकाणी गेलो होतोकाय?" (म्हणजे आपण नुसती मान हलवायची नाही तर "हो" असं प्रत्युत्तर दयायचं तर पुढे काहीतरी ऐकायला मिळणार!). आधी पुण्याच्या MIDC मध्ये होते. काही कारणाने कंपनी बंद पडली. आणि मग हे ड्रायवर झाले.

     तर गाडी निघाली. वाऱ्याच्या थंड झुळकी बरोबर डोकं हलकं व्हायला लागलं. पण आज मी काहीच बोलत नाही म्हटल्यावर अण्णांनी आमचा काही कारणाने तुकडा मोडला आहे हे जाणलंउत्तर अर्थात अनुभव!

"अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राव!"…माझी तंद्री तुटली … "ओ काय हो अण्णा?". अण्णा, "नाहीम्हटलं आल्यापासून शांत आहातकामाचा लोड वाढलाय का? त्रास करून घेऊ नका! मनाला आणि शरीराला त्रास करून काम करू नयेत्य "कामा"ला आपल्या कामाचा त्रास झाला पाहिजे!…काय?"

     बोलवं कि न बोलावं या विचारात असे पर्यंत "हुम्मबरोबर आहे!" निघून गेलंही. "अण्णा, कामाचा त्रास नाही होत होपण त्याचा उचित मोबदला नाही मिळाला तर त्रास होतो. वर्षभर मरेस्तोवर काम करायचं. लेट येतो जातो म्हणून आई-बाबा अधून मधून शाळा घेतातच. बायको कधीतरी फुरंगटून बसते. आणि मित्रं तर डोकं खातातम्हणतात "सप्र्या काम काय तू एकटाच करतो का? शिफ्ट डयुटी तुला एकट्यालाच असतात का? काढ न जरा वेळ आमच्यासाठी!"

     अण्णा "काय सुपरवायझर बरोबर वाजलं का?….आपण शांत राहावं!". मी "अण्णाआज अप्रेजल ची लेटर्स मिळणार होती. (अण्णांना "अप्रेजल" कळतं!). महिन्याचा फक्त ८००/- इन्क्रिमेंट मिळालाय!"

     कचकन ब्रेक मारला गेलागाडी बाजूला घेतली गेली"अभिनंदन "राव" अभिनंदनकाय वो!…एवढी आनंदाची बातमीआss ठss शे रुपयेते पण महिन्याचे! व्वा!". मी बघतच बसलो! पण अण्णांच लक्ष्य नव्हतं माझ्याकडे. ते बाहेर काहीतरी शोधत होते. बहुदा मिळाल्यासारख वाटलं आणि गाडीतून उतरले. थोडं मागे असल्येल्या टपरी मधून ५/- च्या दोन कॅडबरी आणल्या. माझ्या हातात कोंबत "सुखी राहाअसेच पुढे प्रगती करा आणि हो २ दिल्यात …आपल्या बायकोलाहि दया. ती माउली हि खुश होईल तुमच्यासाठी! मघाशी म्हणालात ना? कामाचा चीज व्हत नायअसं नसतं …. माय-बाप, बायको, भाऊ-बहिण सगळे प्रेम करत असतात वो काहींना सांगणं जमतंय काहींना नाय!"

      गाडी निघाली आणि मी त्या कॅडबरी कडे बघत होतो. काहीतरी आठवल्यासारखं अण्णा आज बोलायला लागले होते.  "तुम्हाला माहितीचे अवधूत राव आपल्याला ३ माउली (मुली) आणि एक पांडुरंग आहे (म्हणजे मुलगात्याचं हे नाव नव्हे पण ते मुलाला 'पांडुरंग' म्हणतात!) २००० सालचं सांगतो तुम्हाला. मोठीचं लग्नाचं वयसोयरिकी यायच्या मधलीचं १२ वी झालं होतंधाकली १० वीत तर पोरटं ७ वी त होतं. भोसरी MIDC त कंत्राटी फिटर होतो. मालकांच्या काही कारणाने ती कंपनी बंद पडली. हे कमी होत म्हणून घरोब्यात प्रोपर्टीची भांडणं उखडली गेली." २ मिनिटं अण्णा शांत, अंगावर काटा आल्यासारखे.  म्हणाले, "पायाखालची  जमीन सरकली होती. २-३ महिने दुसरी कडे पण नोकरी शोधली. काही उपेग नाय झाला. पण पांडुरंगाने बक्खळ आशीर्वाद आणि बायकोने अमाप बळ दिलं काय? पण आपल्याला कशाचं व्यसन नाय म्हणून बरंयकाय? हांतर, कसातरी करून गाडी शिकलो मित्राकडून. पन मंग गाडी नाही पन टेम्पो चालवायला मिळाला. म्हटलं हरकत नाय 'ठेविले अनंते तैसेचि राहावे'. दिवस-रात्र चालवायचो. पन टेम्पो चालवून हात आणि पाठ-कंबर लय दुखायची. रात्री बायको आणि मधली पोर हात-पाय-कंबर आणि पाठ चेपून आणि शेकून दयायाची. बायकोच्या अन पोरीच्या हाताची उब मग पुन्हा दुसरा दिवस ढकलून काढाया बळ दयायाची."

     "मोठी समजून गेली होतीआता पुढे शिक्षण नाहीतात्यांना हात दयायचाते मला 'अण्णा' नाय 'तात्या' म्हणतातकाय? तर ती शिकवणी घ्याया लागली आणि धाकल्याला बी शिकवत होती. सगळा करून घर फक्त १०००/- चालत होतं... काय? मंग करत करत साधारण २००५ मध्ये शेकंड -ह्यांड शुमो घेतली. अन पुणं - मुंबई, क्वचित सातारा-सांगली-कोल्हापूर-सोलापूर ला कॅस्टोम्बर न्यायाचो. त्यातून जे कमावलं त्यात मोठीची सोयरिक केली. आता मधलीचं १२ वी होवून कॉलेजात जाया लागली होती. बायकोचे दागिने थोडे दिवस गहाण ठेवले पण बायकोला शबुद दिला व्हता २ वरीस थांब, असेल त्याच्या मना अन जगलो वाचलो तर दागिने परत मिळवून दावतो... काय? मधली म्हटली म्या नोकरी धरतीएका डॉक्टर कडे रेशेप्शानीष्ट म्हणून लागली मला रात्री यायला उशीर झाला न ती आली नसेल तर काळजात धूस-फूस व्हायची. मन कातरून उठायचं. स्वतःलाच विचारायचो "लेका, सांभाळता येत नाही तर काढली कशाला एवढी पोरं !" पण मेहनती वर विश्वास व्हता... काय? माझं काय व्हतय हे कळून एक दिवस तीच म्हटली, "तात्या, उशिर झाला तर पिंट्या येत जाईल क्लिनिक जवळ अन मंग सोबत येऊ आम्ही." काय हवं असतं माय-बापाला अजून? येवढा समजूतदारपणा बी बेस झाला आयुष्य सर-धोपट घालवाया. हीच मधली अन मोठी म्हणाल्या आम्ही १२वी च झालोय पण हि दोघं शिकतील! धाकली मुलगी बी. ये. झाली अन पोरगा डिप्लोमा इंजिनीअर. पोरगी आता मुनिशिपल शाळेत शिकवते अन पोरगा एका इलेक्ट्रोनिक कंपनीत लागलाय, आता ८०००/- कमावतो." अण्णांचं ऊर भरून आलं होतं आणि मीही ऐकत होतो.

      पण, अण्णांचं पुढच वाक्य थोडा विचार करायला लावणारं होतं "तुम्हा आज-कालच्या पोरां पेक्षा कमी आहेअसुदे! पन आहे ते सुख अहे पोराला व्यसन नाही! २०००/- त्याला ठेवतो, २०००/- माय कडे २०००/- मला, उरलेले १५००/- बँकेत टाकतो आणि ५००/- तायांन्साठी ठेवतो भाऊबिजेसाठी म्हणा किव्वा सणासुदीला. आणि होबायकोचे दागिने २ नाही पण ३ वर्षात सोडवले बर काकाय?" मी आकडेवारी चा हिशेब लावेपर्यंत अण्णा म्हणाले "आता मला सांगा त्या सगळ्या माउली अन मुख्य म्हणजे माझी बायको पाठीशी नसती तर जमला असता का हे? काय? आणि पोरं समजूतदार निघाली अन उगी कशाचा वंगाळ हट्ट केला नाय हे बी खरं!"

      मी नुसता होकार दिला पण विचार करत होतो. "तुम्हा आज-कालच्या' म्हणजे त्यांना थोडक्यात 'चंगळवादी' असा सुचवायचं होतं का? का तेव्हाची आणि आत्ताची आर्थिक दरी दाखवायची होती? का काळानुसार तेव्हाही महागाई होती आणि आता हि आहे किंवा व्यक्ती सापेक्ष घरा-घराची परिस्थिती कशीही असली तरी समाजात वावरताना आर्थिक भान आपल्यालाच ठेवावं लागतं हे सुचवायचं होतं? कि "तो लाख करतो म्हणून आपण हि त्याची री ओढू नयेअंथरूण पाहून हात-पाय पसरावेत" नाहीतर समाधानापेक्षा मनस्तापच जास्त होतो असं सांगायचं होतं? पण या पेक्षाही मनाला भिडलेलं अण्णांचं वाक्य म्हणजे "आहे ते सुख आहे!"

      अर्थात मी वाद घालू शकत होतो पण मुडच नव्हता कारण त्यांची अभिमानानं भरलेली छाती आणि गालावरचे थरथरणारे मिशी-कल्ले बघत विचार करण्यातच माझा वेळ गेला होता आणि घर कधी आलं ते कळलंच नाही! पण मला आता कळलं होतं कि माझं डोकं शांत झालंय. मला माझं डोकं का भणभणत होतं त्याचं उत्तर मिळालं होतं आणि उदाहरणही. महिना ८०००/- त अण्णांचा पांडुरंग एवढं करू शकतो तर त्यापेक्षा ३-४ पटीने जास्त पगार + ८०० रुपये असलेला मी का डळमळावं? ठरलं तर उद्यापासून पुन्हा नवी सुरवात, नवी उमेद, नवा जोश आणि नवा संकल्प!

उतरताना नकळत निघून गेलं "चला तात्या येतोसावकाश जा!"


का निघून गेलं तोंडून ते अजूनही कळलेलं नाही पण मागून मात्र तोच प्रेमळ आवाज "सुखी राहा!

कॅब वाले....

वेळ साधारण सकाळची ३:३० - ४ ची …किंवा ११:३० - १२ ची …किंवा रात्री ७:३० - ८ चि मोबाईल कर्कश्य आवाजात किणकिणतो. पलीकडून, "…, हा … ह्याल्लो … अवधूत सर. पिकअप आहे?"... इकडून मी"हाआहे. किती वाजे पर्यंत कॅब येइ " …तो पर्यंत पलीकडच्या धसमुसळ्या ट्रान्सपोर्ट वाल्या कोर्डीनेटरने फोन ठेवलेला (आदळलेला) असतो शिफ्ट सकाळची (मॉर्निंग) किंवा रात्री ची (नाईट) असेल आणि झोपमोड झाली असेल तर दोन अस्सल मराठमोळ्या शिव्या हासडायच्या आणि सो कॉल्ड ऑफिसला जाण्यासाठी आवर-आवरी करायची. आता तुम्ही अगदी घाईत असता आणि परत पुन्हा फोन वाजतो …"सर, कॅब तुमच्या घराखाली उभी आहे सर.… पाच मिनटात येता का सर पुढचे पिकअप आहेत सर"…आता झक मारली आणि कॅब शेडूल बुक केलं असं वाटायला लागतं आणि हेच सगळं पुढच्याला लागू होतं.
आता माझ्यासारखा एखादा कॅब मध्ये झोपत नाही आणि ड्रायवर दादांना न झोपणारा माणूस पुढच्या सीटवर लागतो किंवा आवडतो किंवा चालतो म्हणा हवा तर. तर असा मी आता पुढच्या सीट वर बसतानाच ड्रायवर दादांना नमस्कार-चमत्कारगुड विष वगैरे म्हणतात ते करतो … आणि सोबत वयोमाना नुसार दादा, तात्या, नाना, काका वगैरे उपाधी पण हाणतो … एखादयाचा रुबाब बघून साहेब हि पटकन निघून जातं तोंडातून …समोरचा सावाळासा कॅब ड्रायवर पण खुश होतो. त्याला पण बरं वाटतं तोही जरा खुलतो. आता खरी गोम होते. त्याला एकतर असं वाटत असतं कि आता आपल्या बाजूला जो बसलाय तो ओफिसमध्ये कुणीतरी मोठ्या पदावर आहे किंवा हा जो आपल्या बाजूला बसलेला पोरगा आहे त्याला आज कॅब मध्ये येणाऱ्या सगळ्या मेम्बेरचे पत्ते माहिती आहेत. नेहमीचे येणारे, शिफ्ट मध्ये असणारे मेम्बर माहित असतात, त्यांचे पत्ते सांगून त्यांना घेऊन मी मोकळा होतो. नसतील माहित तर त्याला आधीच सांगतो, बाबारे पुढचे पिकअप कुणाचे आहेत ते आधी सांग गाडी लेट नको व्हायला". मग पुन्हा जरा कोर्डीनेटर शी संपर्क होतो आणि सगळे मेम्बर गाडीत उपस्थित होतात. लॉगशिट भरली जाते आणि बाकीचे मेम्बर कानात हेडफोन लावून गुडूप तरी होतात किंवा तिचं-त्याचं असा जे काही फोनवर चालतं ते गुलुगुलु चालू होतं.
आणि इथून मग आमच्या सारखा विना उद्योगी माणूस काय करणार? एक तर बाहेरची झाडं -पानं -फुलं ट्राफिक बाघणार, दिसलीच तर थोडी डोळ्यांसाठी हिरवळ शोधणार! पण मन बाहेर रमत नाही. मग हळूच आमचा मोर्चा आम्ही आमच्यावर खुश झालेल्या ड्रायवर दादांकडे वळवतो. "काय मग दादा आज पिकअप जरा ५-१० मिनिट लेट झाला नाही का?" (उगाच विषय काढायचा म्हणून काढायचा!)… त्यावर ड्रायवर दादा असं काही आपल्या बाजूला बघतात कि "तुझ्याआयला …आता हितं काय मी BMW चालवतोय का? का रेसिंग खेळतोय? का आता तुझ्यासाठी विमान उडवून आणू या ट्राफिक मधून?" असे त्यांच्या मनात प्रश्न चालू असल्या सारखं वाटतं. पण तरी (बहुदा) मनावर ताबा ठेवून (किंवा बहुतेक तोंडात तोबरा असल्यामुळे उचित वेळ घेऊन किंवा आता ह्यानेच आपल्याला एवढा मान दिलाय तर उलट कशाला बोला म्हणून) "त्याचा काये. अमुक अमुक चौकात ट्राफिक जॅम झालती ना !" "असं का बरं"… "मं दादा, इथं कुठं राहता तुम्ही?" वगैरे संवाद चालू होतात. आणि मग अश्या थोडयाश्या दुर्लक्षिलेल्या किंबहुना हे आपल्यासाठीच राबवण्यात आलेले मजूर आहेत अशी हेटाळणी करण्यात आलेल्या ड्रायवर दादांशी माझा सुसंवाद साधला जातो. या मनीचे त्या मनी केले जातेअनुभवले जाते.
जेव्हा पासून पुण्यात आलोय, म्हणजे साधारण ६ वर्षापासून असा अखंड संवाद चालू आहे या ना त्या कॅब ड्रायवरशी (उर्फ ड्रायवर दादांशी). जवळपास १०० च्या वर वेगवेगळ्या लोकांशी, वेगवेगळ्या वयाच्या, अनुभवाच्या लोकांशी, वेगवेगळ्या गुणाच्या स्वभावाच्या लोकांशी संवाद साधायला मिळतो. अनेक चांगले-वाईट , कडू-गोड अनुभव ऐकायला मिळतात. कित्येक तऱ्हेची हि माणसं - कॅब वाले.
हे एक नवीन सदर म्हणून तूमच्यापुढे मांडण्याचा मी आता प्रयत्न करणारे - उदयापासून. फक्त एक लक्षात ठेवायच कि यात मी नावं मात्र बदलली आहेत. त्यांच्या गोष्टी आणि अनुभव मात्र तेच अहेत.

प्रत्येक सदरा नंतर तुमचा अभिप्राय मात्र नक्की कळवा. वाट बघेन आणि जमल्यास त्या ड्रायवर दादांनाही कळवेन.